शिवाजीनगर ते हिंजवडी या पुणे मेट्रो लाईनच्या उद्घाटनाचा सोहळा नुकताच पार पडला. या कार्यक्रमाला देशाचे पंतप्रधान उपस्थित होते. पण या सोहळ्याने महाराष्ट्राच्या राजकीय आणि सांस्कृतिक वर्तुळात पुनःश्च सातत्याने दुर्लक्षिल्या जाणाऱ्या प्रश्नाला पुन्हा एकदा तोंड फोडले आहे, तो म्हणजे महाराष्ट्रातील मराठी भाषेचे सार्वजनिक ठिकाणचे अस्तित्व आणि आपल्याच नेत्यांची भाषिक अस्मितेबाबतची उदासिनता.
या कार्यक्रमातील सर्व फलक देशाच्या इतर राज्यांची भाषा असलेल्या हिंदीत झळकत होते. एवढेच नाही, तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीही आपले भाषण हिंदीतूनच करणे पसंत केले. हे चित्र पाहिल्यानंतर साहजिकच एक तुलना डोळ्यांसमोर उभी राहते. जेव्हा याच पंतप्रधानांच्या हस्ते चेन्नई मेट्रोचे उद्घाटन झाले, तेव्हा तिथले सर्व फलक, संपूर्ण सजावट आणि कार्यक्रम तमिळ भाषेमध्ये होता. तिथे तमिळ नेत्यांनी आपली मायबोली सोडून हिंदीचा आधार घेतला नाही. या दोन घटनांमधील तफावत केवळ दोन राज्यांमधला फरक दर्शवत नाही, तर ती महाराष्ट्रातील नेत्यांची भाषिक तडजोड आणि तमिळ नेत्यांचा भाषिक स्वाभिमान यातील दरी स्पष्ट करते.
तमिळनाडू, कर्नाटक किंवा दक्षिणेकडील इतर राज्यांनी नेहमीच आपल्या मातृभाषेला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. तिथे राजकीय मतभेद काहीही असोत, पण जेव्हा भाषेचा प्रश्न येतो, तेव्हा सगळे नेते आणि जनता ठामपणे एकवटलेली दिसते. याउलट महाराष्ट्रात परिस्थिती वेगळी आहे. ‘सर्वसमावेशकतेच्या’ नावाखाली किंवा अतिथींचा पाहुणचार करण्याच्या नादात आपण आपली भाषा दुय्यम स्थानावर ढकलत आहोत का, हा प्रश्न पडतो. दिल्लीतल्या नेत्यांच्या उपस्थितीत आपली मायबोली बाजूला ठेवून त्यांच्या भाषेचा स्वीकार करणे, याला जनतेच्या मनात राजकीय लाचारीच मानले जात आहे.
या कृतीतून एकच संदेश जातो की, इथल्या राजकारण्यांना मराठी भाषेविषयी पुरेशी आत्मीयता उरलेली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भूमीत, जिथे शिवरायांनी राजव्यवहार कोष तयार करून मराठीला राजाश्रय दिला, तिथेच आज या भाषेला आपल्या हक्काच्या जागेसाठी संघर्ष करावा लागतोय ही मोठी शोकांतिका आहे. जर राज्याचे नेतृत्वच आपल्याच राज्यात, आपल्याच लोकांशी संवाद साधताना मातृभाषेचा वापर करण्यास कचरत असेल, तर येणाऱ्या पिढीने कोणता आदर्श घ्यावा? नुसतेच आम्हाला मराठी भाषेविषयी आत्मीयता आहे, हे सांगण्यासाठी राजकारणी तोंडाची वाफ का दवडत असावेत?
भाषा हे केवळ संवादाचे माध्यम नाही; ती आपली ओळख, इतिहास आणि संस्कृतीचा कणा आहे. सार्वजनिक ठिकाणे, सरकारी कार्यक्रम, मेट्रोसारखे मोठे प्रकल्प या ठिकाणी भाषेचे असणे हे त्या भाषेचे सामाजिक आणि प्रशासकीय महत्त्व सिद्ध करते. जर अशा भव्य मंचांवरूनच मराठी हद्दपार झाली, तर तिचे अस्तित्व केवळ घराच्या चार भिंतींपुरते मर्यादित राहील.
'अतिथी देवो भव' ही महाराष्ट्राची महान संस्कृती नक्कीच आहे. इतर भाषांचा सन्मान करणे आपल्याला शिकवले जाते. पण दुसऱ्याचा सन्मान करताना स्वतःचा स्वाभिमान आणि स्वतःची ओळख पुसून टाकणे याला सौजन्य म्हणता येणार नाही. जोपर्यंत महाराष्ट्रातील राजकारणी आणि समाज आपल्या भाषेबाबत तमिळनाडूसारखा कणखर बाणा आणि स्वाभिमान दाखवणार नाहीत, तोपर्यंत महाराष्ट्रातच मराठीची अशीच गळचेपी होत राहील. भाषिक आत्मसन्मानासाठी आता केवळ भावनिक न होता, ठाम भूमिका घेण्याची वेळ आली आहे, अन्यथा भविष्यात मराठीचे अस्तित्व टिकवणे हे एक मोठे आव्हान होऊन बसेल.
--- तुषार भ. कुटे
#मराठी #महाराष्ट्र

महाराष्ट्राचं मीठ अळणी.आपला लेक सासुरवाडीसाठी झटतो आणि जावई सासुरवाडीकडून घेऊन जातो
ReplyDelete