कृत्रिम बुद्धिमत्तेचा वेग आणि त्याचा समाजावरील परिणाम आता कोणत्याही शास्त्रज्ञाच्या किंवा सरकारांच्या नियंत्रणाबाहेर जाऊ लागला आहे. तंत्रज्ञान आणि संगणक विश्वाचे एक मोठे प्रणेते, मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी नुकतीच ब्रिटनच्या 'द ऑब्झर्व्हर' या वृत्तपत्राला एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत गेट्स यांनी निराशजनक सुरात असा इशारा दिला आहे की, एआयच्या या नव्या उत्क्रांतीच्या युगात माणसांना मोठ्या प्रमाणावर आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागतील. कॉर्पोरेट जगाची आणि व्यवसायांची सध्याची संपूर्ण मानसिकता आणि प्रोत्साहन रचना चुकीच्या दिशेने जात असून, "रोबोटला कामावर ठेवा, माणसाला कामावरून काढा आणि नंतर मागे वळूनही पाहू नका," अशी क्रूर व्यावसायिक नीती आता जगभर रुजत चालली आहे, अशी सडेतोड टीका त्यांनी केली आहे.
जेव्हा लाखो लोकांच्या नोकऱ्या जातील, तेव्हा त्या बेरोजगार लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, त्यांच्या भविष्यातील शिक्षणासाठी आणि त्यांना नवीन कौशल्ये शिकवण्यासाठी सरकारांना पैशांचे नवीन स्रोत शोधावे लागतील. गेट्स यांनी एका महत्त्वाच्या आर्थिक पेचप्रसंगाकडे लक्ष वेधले आहे. ते म्हणतात की, "एआयमुळे जगाची एकूण समृद्धी नक्कीच वाढेल, परंतु बेरोजगार माणसांना वाचवण्यासाठी आवश्यक असलेल्या 'सुरक्षा जाळ्याचा' निधी मात्र खूप कमी होईल." या महाभयंकर आर्थिक आणि सामाजिक संकटावर उपाय म्हणून बिल गेट्स यांनी एआयच्या वापरावर कर लावण्याची जोरदार शिफारस केली आहे. कंपन्यांना एआय वापरण्यासाठी एक विशिष्ट 'टोकन टॅक्स' भरावा लागू शकतो, ज्याचा उपयोग बेरोजगार कामगारांच्या कल्याणासाठी करता येईल.
यासोबतच, श्रीमंतांवरील कराबाबतही गेट्स यांनी पुरोगामी भूमिका मांडली आहे. जगातील अब्जाधीशांनी जास्त कर भरला पाहिजे, असे त्यांचे ठाम मत आहे. गेट्स यांनी स्वतःच्या आयुष्यात आतापर्यंत १४ अब्ज डॉलर्सचा कर भरला आहे, पण त्यांनी प्रामाणिकपणे कबूल केले आहे की, जर सरकारने मागितले असते, तर ते आजवर भरलेल्या कराच्या दुप्पट, म्हणजेच तब्बल ४० अब्ज डॉलर्सचा कर भरण्यासही आनंदाने तयार होते. अमेरिकेसह अनेक श्रीमंत देशांमध्ये सरकारचा अवाढव्य खर्च आणि कर वसुली यांचा ताळमेळ पूर्णपणे बिघडला आहे. त्यामुळे भविष्यात श्रीमंतांवर जास्त कर लादण्यासोबतच सरकारांना स्वतःचा अनावश्यक खर्चही कमी करावाच लागेल.
एआयचा वापर करून नवीन औषधांचा शोध लावण्यासारख्या चांगल्या गोष्टी नक्कीच घडतील, हे गेट्स मान्य करतात. परंतु, तंत्रज्ञानाची ही अफाट प्रगती जगातील सर्व सरकारांच्या 'गुणवत्तेची आणि क्षमतेची सर्वात मोठी कसोटी' पाहणारी ठरेल. आज जगभरातील विकसित देश आधीच भू-राजकीय तणाव आणि अनेक आघाड्यांवरील समस्यांशी झुंजत आहेत. अशा नाजूक आणि कठीण वेळी एआयचे हे नवे संकट म्हणजे आगीत तेल ओतण्यासारखेच आहे.
सर्वात धक्कादायक आणि चिंतेची बाब म्हणजे, गेट्स यांनी अल्पकाली धोक्यांमध्ये थेट 'बायोटेररिझम' (जैविक दहशतवाद) आणि 'सायबर हल्ल्यांचा' उल्लेख केला आहे. पण त्यांचा सर्वात मोठा आणि भयंकर इशारा हा या दशकाच्या शेवटी, म्हणजेच २०३० च्या आसपास घडणाऱ्या गोष्टींबद्दलचा आहे. गेट्स यांच्या मते, या दशकाच्या अखेरीस कृत्रिम बुद्धिमत्ता ही मानवाच्या पूर्णपणे नियंत्रणाबाहेर जाऊन स्वतंत्रपणे काम करू लागेल. येत्या तीन ते चार वर्षांतच जगाला एआयच्या 'अलाइनमेंट'च्या प्रश्नावर, म्हणजेच यंत्रांनी मानवी हिताच्या विरोधात जाऊन काम करू नये, यावर गंभीरपणे काम करावे लागेल, अन्यथा मानवाचा विनाश अटळ आहे.
या जागतिक संकटात ब्रिटन सध्या इतर देशांच्या तुलनेत चांगल्या स्थितीत आणि सुरक्षित असल्याचे गेट्स यांनी मान्य केले आहे. ब्रिटनच्या एआय धोरणाचे आणि त्यांच्या सरकारी यंत्रणेच्या क्षमतेचे आंतरराष्ट्रीय स्तरावर खूप कौतुक झाले आहे. भविष्यातील धोके लक्षात घेऊन ब्रिटन सरकारने तातडीने आणि वेगाने काही मोठ्या आर्थिक घोषणा केल्या आहेत:
एआय बायोसिक्युरिटी लॅब: जैविक धोक्यांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि वैद्यकीय उपाय शोधण्यासाठी जगातली पहिली प्रयोगशाळा ब्रिटनमध्ये १०० दशलक्ष पौंड्सच्या निधीतून उभारली जात आहे, ज्याला अँथ्रोपिक आणि ओपनएआय सारख्या कंपन्यांकडूनही अतिरिक्त २०० दशलक्ष पौंड्सचे पाठबळ मिळणार आहे.
एआय सिक्युरिटी इन्स्टिट्यूट : एआय मॉडेल्सची सुरक्षा तपासणाऱ्या या प्रतिष्ठित संस्थेला अतिरिक्त १२० दशलक्ष पौंड्सचा निधी जाहीर करण्यात आला आहे.
याशिवाय, 'नॅशनल सायबर शील्ड' (६० दशलक्ष पौंड्स), 'नॅशनल एक्स्पोजर सेंटर' (७० दशलक्ष पौंड्स) आणि नोबेल विजेते सायमन जॉन्सन यांच्या अध्यक्षतेखाली एआयच्या आर्थिक परिणामांचा अभ्यास करणाऱ्या नव्या 'एआय इकॉनॉमिक्स इन्स्टिट्यूट'साठी (२३ दशलक्ष पौंड्स) भरघोस आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.
देशांतर्गत तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि परदेशी कंपन्यांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी 'सॉव्हरिन एआय फंड'मध्येही वाढ करून तो १२० दशलक्ष पौंड्सचा करण्यात आला आहे.
ब्रिटनचे एआय मंत्री कनिष्क नारायण यांच्या मते, ब्रिटनला एआयच्या प्रत्येक क्षेत्रात पुढे जाण्याची गरज नाही. त्याऐवजी, चिप डिझाईन किंवा एआय सुरक्षेसारख्या मोजक्या पण महत्त्वाच्या क्षेत्रांवर एकाधिकार मिळवणे, हे ब्रिटनचे मुख्य लक्ष्य आहे.
या मुलाखतीच्या शेवटी बिल गेट्स यांनी अमेरिका आणि चीन या दोन महासत्तांना एक स्पष्ट इशारा दिला आहे. एआयच्या शर्यतीत या दोन देशांनी परस्परांना केवळ शत्रू म्हणून पाहणे आणि 'एक जिकंणार, दुसरा हरणार' या दृष्टिकोनातून विचार करणे आता सोडून द्यायला हवे. एआयचा धोका हा आता कोणत्याही एका देशापुरता मर्यादित नसून ते थेट संपूर्ण 'मानवतेसमोरील आव्हान' बनले आहे. या महाकाय एआय मॉडेल्समुळे निर्माण होणाऱ्या आणि जगाला भेडसावणाऱ्या महाभयंकर धोक्यांना जर खरोखरच रोखायचे असेल, तर अमेरिका आणि चीनला आपले सर्व मतभेद विसरून एकत्र यावेच लागेल. जर या दोन महासत्तांनी आताही सहकार्य केले नाही, तर मानवाच्या हातून ही बाजी कायमची निसटून जाईल, हाच स्पष्ट संदेश बिल गेट्स यांच्या या मुलाखतीतून जगाला मिळतो.
स्रोत: https://observer.co.uk/news/observer-walk/article/bill-gates-humanity-will-no-longer-be-the-highest-form-of-intelligence
--- तुषार भ. कुटे
#AI

No comments:
Post a Comment
to: tushar.kute@gmail.com