या वर्षीच्या 'नवल' दिवाळी अंकाचे वाचन करताना निसर्गाशी थेट नाते सांगणाऱ्या दोन कथा आणि एक लेख मला विशेष आवडला. निसर्गाचे विविध पैलू, त्यातील गूढता आणि मानवाचा निसर्गाशी असलेला संघर्ष या तिन्ही साहित्यकृतींमधून फार प्रभावीपणे समोर येतो.
यातील पहिली कथा म्हणजे गिरीश देसाई लिखित 'पावलांचा खजिना'. निसर्गातील गूढ आणि अद्याप न उलगडलेले कोडे मानल्या गेलेल्या 'बिग फूट' अर्थात यतीच्या अस्तित्वाचा धागा पकडून लेखकाने ही एक अतिशय सुंदर कथा गुंफली आहे. जसा काळ बदलतो, तसा माणूसही बदलत जातो आणि त्यातून नव्या गरजा व नवे प्रश्न निर्माण होतात. प्रत्येक माणसालाच अज्ञात आणि गूढ गोष्टींचे उपजत आकर्षण असते; असे रहस्यमयी प्राणी आयुष्यात कधीतरी प्रत्यक्ष पाहावेत, ही सुप्त इच्छा प्रत्येकाच्या मनात असते. याच कुतूहलापोटी मित्रांची एक टोळी अमेरिकेतील एका घनदाट आणि दुर्गम जंगलात बिग फूटचा शोध घेण्यासाठी निघते. त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी त्याच भागातील एका स्थानिक तरुणाची सोबत असते. वर्षानुवर्षे मानवी वस्तीपासून पूर्णपणे अलिप्त राहिलेल्या या शांत प्रदेशात अखेर माणसाचा प्रवेश होतो. या प्रवासात मित्रांच्या त्या टोळीला त्या गूढ आणि अद्भुत प्राण्याचे प्रत्यक्ष दर्शनही घडते. परंतु, त्या दर्शनानंतर ते मित्र नेमका कोणता निर्णय घेतात, हे या कथेत वाचण्यासारखे आहे. आज पृथ्वीच्या कानाकोपऱ्यात वाढलेल्या मानवी हस्तक्षेपामुळे निसर्गातील जैवविविधता धोक्यात आली आहे. या गंभीर समस्येवर गूढतेच्या चष्म्यातून प्रकाश टाकणारी ही कथा वाचकाला खिळवून ठेवते आणि तिचा शेवट आपल्याला दीर्घकाळ विचार करायला भाग पाडतो.
दुसरी कथा आहे श्रीनिवास शारंगपाणी लिखित 'वृक्षपर्वाचा अंत', जी उत्क्रांतीच्या एका पूर्णपणे वेगळ्या आणि थक्क करणाऱ्या वाटेवर प्रकाश टाकते. पृथ्वीवरील प्रत्येक सजीवाची उत्क्रांती सातत्याने सुरू असते आणि त्यानुसार वेगवेगळ्या जीवांची बुद्धिमत्ता वेगवेगळ्या प्रकारे विकसित होत जाते. एकेकाळी या पृथ्वीवर 'होमो सेपियन्स' अर्थात बुद्धिमान मानवाचा उदय झाला आणि त्याने जगावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. परंतु, या कथेत लेखकाने एक अफलातून कल्पना मांडली आहे. जर काळाच्या ओघात वृक्षांची बुद्धिमत्ता विकसित झाली आणि त्यांनी पृथ्वीवर ताबा मिळवायला सुरुवात केली, तर काय होईल? स्वतःला या जगाचा सर्वात बुद्धिमान आणि सर्वेसर्वा समजणाऱ्या मानवावर जेव्हा वृक्ष वर्चस्व गाजवू लागतात, तेव्हा पृथ्वीवर वृक्षांचे राज्य सुरू होते. परिणामी मनुष्यप्राणी अल्पमतात जातो आणि वृक्षांचा गुलाम बनतो. ही विलक्षण आणि नाविन्यपूर्ण संकल्पना घेऊन लेखकाने संपूर्ण कथा अतिशय खुबीने फुलवली आहे. आपणच या सृष्टीचे मालक आहोत या भ्रमात राहणाऱ्या माणसाला, इतर सजीव आपल्यावर वरचढ ठरले तर आपली अवस्था काय होईल, याचे वास्तवदर्शी चित्रण या कथेतून अनुभवायला मिळते.
या दोन्ही कल्पक कथांव्यतिरिक्त, विनोद गोरवडकर यांनी प्रसिद्ध निसर्गप्रेमी जेन गुडाल यांच्यावर लिहिलेला 'निसर्गदेवतेची लेक' हा लेखही तितकाच वाचनीय आणि प्रेरणादायी आहे. यापूर्वी काही लेखांमधून जेन गुडाल यांच्याविषयी मला केवळ तुरळक माहिती होती; परंतु या लेखाच्या निमित्ताने त्यांनी चिंपांझी माकडांविषयी केलेल्या सखोल संशोधनाची सविस्तर माहिती पहिल्यांदाच वाचायला मिळाली. या जगात अनेक ध्येयवेड्या माणसांनी आपले संपूर्ण आयुष्य एका विशिष्ट आणि उदात्त कार्यासाठी समर्पित केले आहे, त्यातीलच एक मोठे नाव म्हणजे जेन गुडाल. निसर्ग हाच आपला खरा सखा असून त्याचे संवर्धन करणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे, याच एका ध्यासाने झपाटलेल्या अशा थोर व्यक्तिमत्त्वांची चरित्रे वाचली की मनात एक नवी आत्मस्फूर्ती आणि सकारात्मक ऊर्जा जागृत होते. 'नवल' दिवाळी अंकातील या तिन्ही साहित्यकृतींनी निसर्गाकडे पाहण्याची एक समृद्ध आणि संवेदनशील दृष्टी दिली, हे निश्चित.
--- तुषार भ. कुटे
#मराठी #परीक्षण

No comments:
Post a Comment
to: tushar.kute@gmail.com